बीड प्रतिनिधी : अजित पवार गट महायुतीसोबत गेल्याने भाजपमधलेच अनेक इच्छुक शरद पवार गटाच्या वाटेवर आहेत, त्यामुळे एकीकडे भाजपवर पवारांचा पक्ष फोडल्याचा आरोप होत असला तरी आता त्याची राजकीय परतफेड म्हणून की काय पण पवारांनीच भाजपला गळती लावल्याचं बघायला मिळतंय.अजितदादांमुळे 21 मतदारसंघातले भाजपचे इच्छुक नाराज असल्याची चर्चा आहे. याआधीच घाडगे आणि पठारे पवार गटात डेरेदाखल झाले आहेत, त्यामुळे भाजपचं आणखी कोण कोण गळाला लागणार? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.2019 च्या विधानसभा निवडणुकीत तब्बल 21 ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार भाजपला हरवून निवडून आलेत, पण मध्यंतरी अजित पवारांनी अख्खा पक्षच भाजपसोबत नेल्याने महायुती बळकट झालीय खरी, पण आता त्याच अजित पवारांचे आमदार भाजपातल्या इनेक इच्छुकांना विस्थापित करायला निघालेत. कारण महायुतीच्या जागावाटपात समोरासमोर फाईट झालेल्या त्या 21 जागा देखील राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदारांना जाणार हे एक उघड गुपित आहे. कदाचित म्हणून कागलचे समरजीत घाडगे वाजत गाजत पवार गटात सामील झाले देखील. इकडे पुण्यातल्या वडगाव शेरीतही माजी आमदार बापू पठारेंनी अनंत चर्तुदशीला सिल्व्हर ओक गाठून भाजपला बाय बाय केलं.
